Video: "भारताचं नाव खराब करतेस!" उर्फीचा ड्रेस पाहून आजोबांचा संताप; मुंबई एअरपोर्टवर राडा

Urfi Javed Verbal Spat With Old Man: हा संपूर्ण घटनाक्रम मुंबई विमानतळावर घडला. हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच घडला असून या व्हिडीओवरुन आता लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून उर्फीच्या भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2023, 11:29 AM IST
Video: "भारताचं नाव खराब करतेस!" उर्फीचा ड्रेस पाहून आजोबांचा संताप; मुंबई एअरपोर्टवर राडा title=
मुंबई विमानतळावरच झाला राडा

Urfi Javed Verbal Spat With Old Man: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी फॅशन आणि कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. कधी मोबाईल चार्जर पाहून बनवलेला ड्रेस तर कधी धान्याच्या गोणीपासून बनवलेला ड्रेस घालून उर्फी दिसते. सार्वजनिक ठिकाणी अजब कपडे घालून फिरणाऱ्या उर्फीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिला या अतरंगी चॉइसमुळे अनेकदा ट्रोलही केलं जातं. तिच्या या कपड्यांच्या निवडीवरुन भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही मध्यंतरी आक्षेप घेतला होता. यावरुन बराच वादही झाला होता. अनेकदा उर्फी स्वत:ही या कपड्यांमधील फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करते. मात्र नुकताच तिला मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये ती एका आजोबांबरोबर वाद घालताना दिसत आहे. 

नेमकं घडलं काय?

मुंबई विमानतळावर नेहमीप्रमाणे आपल्या अतरंगी कपड्यांमध्ये दाखल झालेल्या उर्फीला एका आजोबांनी झापलं. उर्फीचे कपडे पाहून आजोबांनी अशी काही प्रतिक्रिया दिली की ती रागाने लालबुंद झाली. आजोबांची प्रतिक्रिया ऐकून उर्फीनेही रागात त्यांना जशास तसं उत्तर दिलं. उर्फीच्या वादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने या आजोबांसाठी वापरलेल्या भाषेवरुनही अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

आजोबा काय म्हणाले?

हा व्हिडीओ विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये उर्फी मुंबई विमानतळावर आल्यानंतर तिला पाहून एक आजोबा चांगलेच संतापलेले दिसतात. ते रागातच, "भारतामध्ये असे कपडे वापरण्यास परवानगी नाही. इंडियाचं (देशाचं) नाव खराब करत आहेस तू," असं म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. आजोबांनी कपड्यांवरुन केलेली कमेंट ऐकून उर्फीही भडकली. "तुमच्या बापाचं काय जातं? जा तुम्ही तुमचं काम करा," असं जरा उद्धट उत्तर उर्फीने या आजोबांना दिलं.

लोकांनी व्यक्त केली वेगवेगळी मतं

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या आजोबांची बाजू घेतल्याचं दिसत आहे. कोणीतरी उर्फीला असं थेट ऐकवण्याची हिंमत केली, असं म्हणत समाधान व्यक्त केलं आहे. अन्य एकाने, या आजोबांना आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे. एवढ्या गर्दीमधून त्यांनीच बोलायची हिंमत केली, असं म्हटलं आहे. तर काही जणांनी उर्फीची बाजू घेतली असली तरी तिने अधिक चांगली भाषा वापरणं अपेक्षित होतं असंही म्हटलं आहे.