माझे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि भाऊ मुस्लीम; विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा, नेटकरी गोंधळले

अभिनेता विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारात (69th Filmfare Awards) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला आहे.  

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2024, 04:16 PM IST
माझे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि भाऊ मुस्लीम; विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा, नेटकरी गोंधळले title=

बॉलिवूड चित्रपट '12th Fail' च्या यशामुळे विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) जबरदस्त प्रसिद्धी मिळाली आहे. चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर एकीकडे विक्रांत मेस्सीच्या अभिनयाचं कौतुक होत असताना दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान विक्रांत मेस्सीने एका मुलाखतीत आपल्या भावाने मुस्लीम धर्म स्विकारल्याचा खुलासा केला आहे. त्याने नेमकं काय घडलं होतं याचा घटनाक्रमही सांगितला आहे. 

"माझ्या भावाचं नाव मोईन असून, माझं नाव विक्रांत आहे. तुम्हाला माझ्या भावाचं नाव मोईन कसं काय याचं आश्चर्य वाटत असे. त्याने धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्विकारला आहे. माझ्या कुटुंबाने त्याला धर्मांतराची परवानगी दिली. ते म्हणाले होते जर तुला याच्यातून समाधान मिळत नसेल तर नक्की कर," असा खुलासा विक्रांत मेस्सीने केला.

पुढे त्याने सांगितलं की, "त्याने वयाच्या 17 व्या वर्षी धर्मांतर केलं. हे फार मोठं पाऊल होतं. माझी आई शीख आहे. माझे वडील ख्रिश्चन आहेत. ते आठवड्यातून दोन वेळा चर्चमध्ये जातात. मी फार लहान वयापासून धर्म आणि अध्यात्मासंबंधी चर्चा ऐकली आहे".

दरम्यान यावर आपले नातेवाईक कशाप्रकारे व्यक्त झाले होते हेदेखील विक्रांत मेस्सीने सांगितलं. तो म्हणाला की, "माझ्या वडिलांना अनेक नातेवाईकांनी तुम्ही मुलाला धर्मांतरासाठी परवानगी कशी काय दिली याबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमचं याच्याशी काही देणंघेणं नाही असं सांगितलं होतं. तो माझा मुलगा असून, फक्त मलाच उत्तरदायित्व आहे. तो त्याला जे हवं ते करु शकतो. हे पाहिल्यावर धर्म म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडून मी स्वतःच्या शोधात निघालो. तो मानवनिर्मित आहे".

याच मुलाखतीत विक्रांत मेस्सीने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी कशाप्रकारे आपण टीव्हीमधील यशस्वी करिअर मागे सोडलं याबद्दल सांगितलं तो म्हणाला की, "मी टीव्हीतून फार कमाई केली. वयाच्या 24 व्या वर्षी मी पहिलं घऱ खरेदी केलं. पण टीव्हीवर सर्व प्रतिगामी कंटेंट एकाच वेळी घडत होते आणि मला त्या जगातून बाहेर पडून सिनेमात नशीब आजमावावं वाटत होतं. मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतानाही मला चांगली झोप लागत नव्हती. मी पालक आणि इतरांप्रती माझ्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर याची जाणीव झाली".

"मी जेव्हा पालकांना चित्रपटांमधून नव्याने सुरुवात करत आहे असं सांगितलं तेव्हा त्यांना धक्का बसला. मी फार पैसे कमावत होतो. वयाच्या 24 व्या वर्षी मी महिन्याला 35 लाख कमावत होतो. खासकरुन जो मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी आहे. माझ्या हातात महिन्याला 35 लाख कमावण्याचा करार असतानाही मी टीव्हीमधील करिअर सोडलं. मी चांगले चित्रपट करुन शांतता मिळवण्याचं ठरवलं," असं विक्रांत मेस्सी म्हणाला.