'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख

Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 29, 2024, 04:02 PM IST
'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख title=
प्रसारमाध्यमांसमोर जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: मराठा आरक्षाच्या मुद्द्यामुळे मागील वर्षभरापासून सातत्याने चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरु झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे-पाटलांनी उमेद्वारी मिळावी यासाठी काही नेत्यांकडून आतापासूनच त्यांना उमेदवारी देण्यासाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे- पाटलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी या मागणीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

जरांगेंना उमेदवारीची मागणी

जालन्यातील अंतरवली सराटी येथून मराठा आंदोलनाला महाराष्ट्रभर नेणाऱ्या मनोज जरांगेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकरांनी असा प्रस्तावच ठेवला आहे. याच प्रस्तावासंदर्भात मनोज जरांगे-पाटलांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेची उमेदवारी तुम्हाला द्यावी अशी मागणी केल्याचं सांगत प्रश्न विचारला.

निवडणूक लढण्याबद्दल काय म्हणाले जरांगे?

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज-जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा समोर असताना राजकारणात येण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "हे (उमेदवारी देण्याची मागणी करणं) त्यांचं मोठेपण आहे. माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. गृहमंत्र्यांनी षड्यंत्र रचून मराठ्यांसमोर जे संकट उभं केलं आहे. त्याला मी तोंड देत आहे. राजकारण हा माझा अजेंडा नाहीच. त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा आहे हा. ते समाजाच्या आंदोलनात आमच्यासोबत आहेत. त्याबद्दल मी नंतर सविस्तर बोलेन," असं उत्तर मनोज जरांगे-पाटलांनी दिलं आहे.

नक्की वाचा > 'कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..'; 'अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्टच बोलले

ट्रायडेंटमध्ये झाली बैठक

महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी जागावाटपावर चर्चा केली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 4 प्रतिनिधी उपस्थित होते. याआधी 27 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत पक्षाच्या वतीने वंचितचे राज्य उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणखीन काही बैठका जागावाटपासंदर्भात होतील असे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जागा वाटपाची घोषणा आम्ही थेट पत्रकार परिषदेमध्येच करु असं म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> Lok Sabha Election 2024 BJP First List: भाजपाकडून गंभीरची विकेट? सेहवागवर नवी जबाबदारी?

नागपूरमधील त्या जागेवर दावा

वंचित बहुजन आघाडीने भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरातील रामटेकच्या लोकसभा जागेवर दावा केला आहे. 1 मार्चला रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी भव्य शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. याच जागेसाठी महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून आणि उद्धव ठाकरे गटाकडून दावा केला जात होता. मात्र आता या जागेवर वंचितनं देखील दावा केलाय.