LokSabha: 'प्रीतम खासदार असताना मी 5 वर्षं घरी बसले', उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

भाजपाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने प्रितम मुंडेंच्या जागी पंकजा मुंडे यांना स्थान दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 14, 2024, 03:37 PM IST
LokSabha: 'प्रीतम खासदार असताना मी 5 वर्षं घरी बसले', उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या title=

भाजपाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने बुधवारी दुसरी यादी जाहीर केली असून, त्यात पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. दरम्यान आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसंच धनंजय मुंडेंचा पक्ष सोबत असल्याने ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रीतमला जास्त वेळ घरी थांबावं लागणार नाही असं सूचक विधानही त्यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. 

"महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली ही सन्मानजक बाब आहे. 10 वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या, तेव्हा मी राज्याचं राजकारण करत होते. आता मी थेट केंद्रात जाणार असल्याने संमिश्र भावना असून, धाकधूक वाटत आहे. पण या नव्या अनुभवासाठी मी तयार आहे," अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. 

"मला लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी आशा होती, पण फार आत्मविश्वास नव्हता त्यामुळे फार मोठा धक्का बसला नाही. कारण सगळीकडे याची चर्चा होती," असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. 

"गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानानंतर प्रीतम मुंडे आपल्या डॉक्टरकीचं करिअर सोडून राजकारणात आल्या होत्या. आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन चांगलं होतं. मी राज्य आणि त्या जिल्हा सांभाळायच्या. मी धोरणात्मक निर्णय घ्यायचे आणि त्या व्यक्तिगत गोष्टींना स्पर्श करायच्या. त्या खासदार असताना मी 5 वर्षं घरी बसले. आम्हाला तोदेखील अनुभव आहे. पण  प्रीतम मुंडेना तितका वेळ वाट पाहावी लागणार नाही. त्यांना विस्थापित करणार नाही या शब्दावर मी कायम आहे", असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. 

"धनंजय मुंडे माझे बंधू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या आणि आमच्या पक्षाची युती आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. युतीनंतर माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता मला लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. मला वाटतं त्यांच्या येण्याने प्रीतम मुंडेंपेक्षा जास्त मताधिक्य वाढेल. ज्याप्रमाणे धनंजय मुंडे आम्हाला मदत करतील, तशीच मदत आम्ही त्यांना करू," असंही पंकजा मुंडे परळी विधानसभा निवडणुकीबाबत म्हणाल्या आहेत. 

 

आम्ही दोघींपैकी एकीचं नाव येईल याची खात्री होती. त्यामुळे मनात भीती असण्याचं कारण नव्हतं असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असून, तोच सन्मान म्हणून मी स्विकार करते असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे. सध्या जसं नव्या नोकरीवर जाताना, लग्नासाठी बोहल्यावर चढताना वाटते तशी धाकधूक वाटत आहे असं त्या म्हणाल्या.