Maharastra Politics : 'आदित्यला मुख्यमंत्री करायचंय पण...', उद्धव ठाकरेंचं अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर!

Uddhav Thackeray Criticized Amit Shah : उमरगा सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी जय शहांच्या बीसीसीआय सचिव पदावरून अमित शहा यांना धारेवर धरलं.

सौरभ तळेकर | Updated: Mar 7, 2024, 08:51 PM IST
Maharastra Politics : 'आदित्यला मुख्यमंत्री करायचंय पण...', उद्धव ठाकरेंचं अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर! title=
Uddhav Thackeray, Amit Shah, Maharastra Politics

LokSabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढाई सुरू झाली आहे. दोन्ही बाजूचे नेते आता आक्रमक आगपाखड करताना दिसतायेत. उबाठा गटाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात दाखल झाले. उमरगामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार (Uddhav Thackeray rally in Omraaga) पडली. संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे आणि इतर महत्त्वाचे नेत्यांनी या सभेला उपस्थित लावली होती. अशातच या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा चांगलाच समाचार घेतला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अमित शाह म्हणाले उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय. अमितजी तुम्हीही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आधी लोकसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीतून मुख्यमंत्री होत नाही. विधानसभेत निवडून आला तर मुख्यंत्री होतो. या अमित शहांना औरंगाबादचं संभाजीनगर अन् उस्मानाबादचं धाराशीव केलं हे माहिती नाही, तर देशाच्या गृहमंत्र्यांना काय कळतंय. बरं मला आदित्यचं मुख्यमंत्री करायचंय, पण तुम्ही निवडून दिलं तर करणार ना..! महाराष्ट्राने निवडून दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाहीये, जसं तुम्ही फोन करून जय शहाला बसवलंत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली.

तुमची दादागिरी चालते. कोण आहे जय शहा? काय त्याचं कर्तृत्व आहे? त्याचं क्रिकेटमध्ये काय योगदान आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. वर्ल्ड कपची फायनल मॅच गुजरात नेण्यासाठी त्याला तुम्ही सचिव केलं. माझा जाहीर आरोप आहे... गद्दारी करून सरकार पाडलं. माझा दोष काय होता? शेतकऱ्यांना मदत करणं माझा दोष होता का? मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो, त्यामुळे यांनी सरकार पाडून कटकारस्थान रचलं. आमचा शिवरायांचा महाराष्ट्र लुटून गुजरातला देण्याचं काम चालू आहे, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

पाहा संपूर्ण भाषण

अमित शहा काय म्हणाले होते?

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी जळगावमधील सागर पार्कमध्ये सभा घेतली होती. मोदींनी विकसीत भारताचं लक्ष ठेवलं आहे. महान भारताचं टार्गेट ठेवलं आहे. पण सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. उद्धव ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.