मतदान करा आणि 20 टक्के डिस्काऊंट मिळवा! मुंबईतल्या हॉटेलांची अनोखी ऑफर

Mumbai Lok Sabha Election 2024 5th Phase Voting: मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई आहार असोसिएशनद्वारे एक स्तुत्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.

Updated: May 20, 2024, 11:06 AM IST
मतदान करा आणि 20 टक्के डिस्काऊंट मिळवा!  मुंबईतल्या हॉटेलांची अनोखी ऑफर title=

Mumbai Lok Sabha Election 2024 5th Phase Voting: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध प्रकारच्या योजना आखल्या जातात. आता यात हॉटेल व्यावसायिकांनाही पुढाकार घेत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. 

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई आहार असोसिएशनद्वारे एक स्तुत्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा, आणि 20 टक्के डिस्काउंट मिळवा’ असा उपक्रम राबवला जात आहे. मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

मतदान करणाऱ्या नागरिकांना विशेष डिस्काऊंट

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 20 मे आणि 21 मे रोजी मुंबईतील 100 हून अधिक रेस्टॉरंटमध्ये मतदान करणाऱ्या नागरिकांना विशेष डिस्काऊंट दिला जाणार आहे. मुंबईतील 100 हून अधिक हॉटेल्समध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मुंबई विभागाने निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली आहे. 

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी Democracy Discount ही मोहिम नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे राबवली जात आहे. या मोहिमेतंर्गत NRAI संलग्न रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणाऱ्या मतदारांना त्यांच्या एकूण बिलावर 20 टक्के सूट दिली जाणार आहे. यासाठी मतदारांना फक्त त्यांच्या बोटावर लावलेली शाई दाखवावी लागणार आहे. त्यानंतरच ही सूट दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

5 टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

आहार असोसिएशन अंतर्गत एकूण 8000 हॉटेल्स आहेत. यात लहान हॉटेल्सपासून मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे. मुंबईत डिस्काउंट देणाऱ्या हॉटेलची संख्या ही 1 हजाराच्या घरात आहे. या हॉटेल्समध्ये तुम्ही तुमच्या बोटाला लावलेली शाई दाखवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पाच टक्क्यांपासून ते 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.