विराट कोहलीचा सुनील गावस्करांना सणसणीत टोला, नाव न घेता म्हणाला..'मुझे बताने की जरुरत नहीं...',

Virat Kohli Savage Reply to critics : विराट कोहली अन् सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यातील वाकयुद्ध अजूनही थंड होण्याचं नाव घेत नाहीये. विराटने आता गावस्करांना पुन्हा खणखणीत उत्तर दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 18, 2024, 08:59 PM IST
विराट कोहलीचा सुनील गावस्करांना सणसणीत टोला, नाव न घेता म्हणाला..'मुझे बताने की जरुरत नहीं...',  title=
Virat Kohli vs Sunil Gavaskar

IPL 2024 Virat Kohli on Sunil Gavaskar : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचे माजी स्टार फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. सुनील गावस्कर यांनी विराटच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोघांनी एकमेकांवर टीका केली मात्र नाव न घेता. अशातच आता विराटने पुन्हा सुनील गावस्कर याच्यावर निशाणा साधलाय. सुनील गावस्करांनी कोहलीच्या यशाचं श्रेय धोनीला दिलं होतं. त्यावर विराटने खडेबोल सुनावले.

काय म्हणाला विराट कोहली?

मला उत्तर देण्याची गरज नाहीये. मला माहितीये की मी मैदानावर काय करू शकतो. त्यासाठी मला कोणीही सांगण्याची गरज नाहीये की मी कसा प्लेयर आहे आणि माझी क्षमता काय आहे. सामना कसा जिंकायचा यावर मी कधी बोललो नाही. मी स्वत:हून शिकलोय. मी परिस्थिती लक्षात घेऊन, धडपडत, पराभव स्विकारून खुप काही शिकलोय. चला बाय चान्स तुम्ही सामना जिंकलात. पण इतके सामने तुम्ही अनेकदा जिंकून देताय तर हे बाय चान्स होऊ शकत नाही, असं विराट कोहली म्हणाला आहे. 

तुम्हाला कोणीतरी येऊन सांगावं, की आज तू चांगला खेळलास, पण मला कोणाच्या संमतीची गरज नाहीये. मला कोणाकडूनही खात्री नकोय. मी माझ्या वडिलांकडून खूप आधीच हे शिकलोय. मला माझा खेळ म्हत्त्वाचा आहे. त्यांनी ते खूप आधीच मला शिकवून ठेवलंय, असंही विराट यावेळी म्हणाला आहे.

सुनील गावस्कर काय म्हणाले होते?

विराट कोहलीच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला जेव्हा त्याचं करियर सेट झालं नव्हतं तेव्हा त्याच्या खेळीत सुधारणा होत नव्हती. सुरूवातीच्या टप्प्पयात तो फारशी चांगली कामगिरी करत नव्हता तरी देखील धोनीने त्याला संधी दिली. तो फॉर्ममध्ये नसताना देखील त्याला संघात ठेवलं. याच कारणामुळे आपण आज विराट कोहलीला या स्तरावर पाहतोय, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं. त्यावर आता विराटने जोरदार उत्तर दिलंय.

दरम्यान, पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा विराटला त्याच्या अफलातून खेळीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना विराटने स्ट्राईक रेटचा विजय काढला अन् गावस्करांना कोपरखळी मारली. इनिंगमध्ये माझा स्ट्राइक-रेट कायम राखणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, असं म्हणत विराटला हसला. त्यामुळे विराटने गावस्करांना टोला लगावला होता.