'मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड, येत्या निवडणुकीत जरांगेंना...' नव्या आरोपाने खळबळ

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलन प्रकरणी एसआयटी स्थापन करा आदेश विधानसभा अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत. तर कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 27, 2024, 03:18 PM IST
'मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड, येत्या निवडणुकीत जरांगेंना...' नव्या आरोपाने खळबळ title=

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी (SIT) चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला. मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. जरांगेंशी काहीही देणंघेणं नाही मात्र त्यांच्यामागे बोलवता धनी कोण हे शोधून काढणारच अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी (Devendre Fadanvis) सभागृहात मांडली. त्यावर बिनधास्त चौकशी करा अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिलीय.

मनोज जरांगेंच्या विधानांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सभागृहात सविस्तर प्रतिक्रिया दिली. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण, सरसकट, सगेसोयरे, ओबीसीतून आरक्षण अशा भूमिका जरांगे बदलत राहिले याची आठवण मुख्यमंत्री शिंदेंनी करुन दिली. तसंच जरांगेंना सगळं देऊनही अशी भाषा का असा सवालही शिंदेंनी सभागृहात विचारला. दरम्यान, जरांगेंच्या आंदोलनाबाबत राजेश टोपेंचीही चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे. दगडफेकीचा कट टोपेंच्या कारखान्यावर शिजल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर सगळी चौकशी करा कर नाही त्याला डर कशाला असा टोला जितेंद्र आव्हाडांनी दरेकरांना लगावलाय.

संगीता वानखेडेंचे जरांगेंवर आरोप
दरम्यान मनोज जरांगे यांच्या जुन्या सहकारी संगीता वानखेडे यांनी पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ जरांगे पाटलांवर भूमिका घेत होते त्या भूमिकेचे मी समर्थन करते, मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी करा अशी मागणी संगीता वानखेडे यांनी केली आहे. अनेक राजकीय नेत्यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे, जरांगे पाटलांची चौकशी झाल्यावर सगळं दूध कमी पाणी का पाणी होईल, शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत मिळेतय, सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा अशी मागणीगी संगीता वानखेडे यांनी केलीय.

मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड असल्याचा आरोप करत संगीता वानखेडे यांनी गरज पडल्यास माझी देखील चौकशी करा असं म्हटलंय. जाणून बुजून माझी बदनामी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या निवडणूकित जरांगे याला त्याची माणसे निवडून आणायची आहेत, यासाठी गावागावातून पैसे गोळा होत आहेत असा गंभीर आरोपही संगीता वानखेडे यांनी केलाय. मनोज जरांगे यांनी आमच्या समाजाचं वाटोळं केलं, आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होत आहेत.  छगन भुजबळ आरोप करत होते ते आरोप खरे होते त्यांची भूमिका योग्य होती त्या भूमिकेचे मी समर्थन करत असल्याचं संगीता वानखेडे यांनी सांगितलं.

चौकशीची विरोधकांची मागणी
जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केलीय. गृहमंत्री या नात्यानं फडणवीसांनी सत्य समोर आणलं पाहिजे असं खडसे म्हणालेत. आपल्याला सलाईनमधून विष देऊन जिवे मारण्याचा कट होता असा आरोप जरांगेंनी केला होता,त्यावर खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय.