पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: May 18, 2024, 01:46 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल title=

Ahmednagar Sanjay Raut Case Filed : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर लोकसभा मतदरासंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगर शहरातील क्लेराब्रुस मैदानावर 8 मे रोजी संध्याकाळी संजय राऊत यांची सभा पार पडली होती. यावेळी सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केला होता. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? अशा पद्धतीने संजय राऊत यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अतुल काजळे या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती.   

अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांकडून गुन्हा दाखल

तसेच अॅड. मनोज जैस्वाल यांनीही निवडणूक शाखेकडे तक्रार दाखल केली होती. आता या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक शाखेकडून संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत येथील अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांना प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आता संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्या विरोधात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने भादंवि कलम 171 (क), 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावर पुढील काय प्रक्रिया होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.