आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून 3 संघ बाहेर, एका संघाची एन्ट्री, आता 3 स्थानांसाठी 6 संघात चुरस... असं आहे गणित

IPL Playoffs 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 आता प्ले ऑफच्या टप्प्यात पोहोचली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर पडलेत. तर कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारा एकमेव संघ ठरलायत. आता प्ले ऑफच्या तीन जागांसाठी सहा संघांमध्ये चुरस रंगली आहे.

राजीव कासले | Updated: May 14, 2024, 04:10 PM IST
आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून 3 संघ बाहेर, एका संघाची एन्ट्री, आता 3 स्थानांसाठी 6 संघात चुरस... असं आहे गणित title=

IPL Playoffs 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये 13 मे पर्यंत म्हणजे गेल्या 63 दिवसात एकूण 53 सामने खेळले गेले आहेत. आयपीएल स्पर्धा प्ले ऑफच्या (IPL Play Off) शर्यतीत पोहोचली असून मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. तर श्रेयस अय्यरचा कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये एन्ट्री करणारी एकमेव संघ ठरला आहे. 13 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाला. याचा फटका गुजरात टायटन्सला बसला. यामुळे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सपाठोपाठ गुजरात टायन्सही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला किती संधी?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) आतापर्यंत 13 सामने खेळलेत. त्यांच्या खात्यात 12 पॉईंट जमा आहेत. आरसीबीचा नेट रन रेट 0.387 इतका आहे. आरसीबीचा चौदावा आणि शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) 18 मे रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. आरसीबीने शेवटचे सलग पाच सामने जिंकलेत. त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये आरसीबी पाचव्या स्थानावर पोहोचलाय. आता आरसीबीने चेन्नईला हरवल्यास त्यांच्या खात्यात 14 पॉईंट जमा होतील. त्यामुळे आरसीबीचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान कायम असेल. पण यासाठी आरसीबीला दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघ 16 पॉईंटसवर पोहोचू शकतात. असं झाल्यास आरसीबीला प्ले ऑफमधून बाहेर पडावं लागेल. आरसीबी आणि चेन्नईदरम्यान सामना नॉकआऊट असेल. म्हणजे आरसीबीला चेन्नईविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्सची किती शक्यता?
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारी चेन्नई सुपर किंग्स आतापर्यंत 13 सामने खेळलीय आणि त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. चेन्नईचा नेट रनरेट 0.528 इतका आहे. चेन्नईचा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध आहे. राजस्थानविरुद्धच्या मोठ्या विजाने चेन्नईचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्थान भक्कम झालं आहे. पण चेन्नईला बंगळुरुविरुद्ध पराभव पत्कारावा लागला तर चेन्नई 14 पॉईंटवरच राहिल. अशा, राजस्थान, हैदारबाद आणि लखनऊला चेन्नईपेक्षा जास्त संधी असेल. 

दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑपमध्ये पोहोचणार?
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघाही प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान टिकवून आहे. दिल्लीने आतापर्यंत 13 सामने खेळलेत आणि त्यांच्या खात्यात 12 पॉईंट जमा आहेत. दिल्लीचा शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी दिल्लीला लखनऊविरुद्धचा सामना केवळ जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने त्यांना हरवावं लागणार आहे. पण त्याचबरोबर हैदराबादच्या सामन्यावरही त्यांचं भवितव्य ठरणार आहे. हैदराबादचा संघ पुढचे दोन्ही सामने हरला तर दिल्ली टॉप फोरमध्ये दाखल होईल. शिवाय त्यांना लखनऊला 64 धावांनी पराभूत करावं लागणार आहे. ही शक्यता फारच कमी आहे. 

राजस्थान रॉयल्सची मजबूत दावेदारी
राजस्थान रॉयलने 12 सामन्यात 16 पॉईंट पटकावले आहेत. त्यांचे पुढचे दोन सामने पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर म्हणजे जयपूरमध्ये खेळवले जाणार आहेत. राजस्थानला गेल्या सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. प्ले ऑफसाठी राजस्थानला दोन पैकी एक सामना जिंकावा लागणार आहे. 

तर सनरायजर्स हैदराबादलाही संधी
सनरायजर्स हैदराबादच्या खात्यात 12 सामन्यात 14 पॉईंट जमा आहेत. त्यांचा नेट रन रेट 0.406 इतका आहे. पुढचे दोन सामने त्यांना गुजरात आणि पंजाबविरुद्ध खेळायचे आहेत. होम ग्राऊंडवर हैदराबादची आतापर्यंतची कामगिरी तुफान झालीय. पुढचे दोन्ही सामने जिंकल्यास हैदारबाद टॉप दोनमध्ये असेल. पण दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला तर मात्र त्यांचं प्ले ऑफमधलं स्थान धोक्यात येऊ शकतं.

लखनऊ सुपर जायंटसही शर्यतीत
प्ले ऑफमध्ये जाण्याच्या शर्यतीत आणखी एक संघ आहे तो म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स. लखनऊने 12 सामन्यात 12 पॉईंटची कमाई केली आहे. पण लखनऊचा रनरेट  -0.769 आहे. दिल्ली आणि मुंबईबरोबर त्यांना दोन सामने खेळायचे आहेत. निगेटिव्ह रनरेटमुळे लखनऊला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.